कर्नाटक
भारतातील एक राज्य. / From Wikipedia, the free encyclopedia
कर्नाटक (कन्नड भाषेत :ಕರ್ನಾಟಕ, उच्चार [kəɾˈnɑːʈəkɑː] (मदत·माहिती)) हे भारताच्या दक्षिणेकडील पाच राज्यांपैकी एक राज्य आहे. राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी म्हैसूर राज्य म्हणून झाली व १९७३ मध्ये या राज्याचे नाव कर्नाटक असे बदलण्यात आले.
?कर्नाटक भारत | |
— राज्य — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | १,९१,७९१ चौ. किमी[1] |
राजधानी | बंगळूर |
मोठे शहर | बंगळूर |
जिल्हे | ३१ |
लोकसंख्या • घनता |
६,१०,९५,२९७ (९ वा) (२०११) • ३१८.६/किमी२ |
भाषा | कन्नड |
राज्यपाल | हंसराज भारद्वाज |
कर्नाटकचे मुख्यमंत्री | सिद्धारमैया |
विधानसभा (जागा) | विधानसभा, विधान परिषद (२२४ + ७५) |
आयएसओ संक्षिप्त नाव | IN-का |
संकेतस्थळ: कर्नाटक सरकार संकेतस्थळ | |
कर्नाटक चिन्ह |
कर्नाटकाच्या पश्चिमेला अरबी समुद्र व गोवा हे राज्य आहे. उत्तरेला महाराष्ट्र, पूर्वेला आंध्रप्रदेश आणि दक्षिणेला केरळ व तमिळनाडू ही राज्ये येतात. राज्याचे क्षेत्रफळ १,९१,७९१ चौरस किलोमीटर इतके आहे. ते भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या ५.८३% इतके आहे. कर्नाटक हे क्षेत्रफळानुसार भारतातले ८ वे मोठे राज्य आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने त्याचा भारतात ९ वा क्रमांक आहे. कर्नाटक राज्यात ३१ जिल्हे आहेत. कन्नड ही राज्याची मुख्य भाषा असून मराठी, कोकणी, तुळू व तामिळ ह्याही काही भाषा बोलल्या जातात.
कर्नाटक या नावाचे अनेक अर्थ आहेत. करु = उंच अथवा उत्कर्षित व नाडू = भूमि. म्हणजेच उत्कर्षित भूमिचा प्रदेश. हा त्यांपैकी एक अर्थ. तसेच दुसरा अर्थ : करु = काळा रंग + नाडू = भूमि. म्हणजे काळ्या रंगाच्या मातीचा प्रदेश. ही काळी माती महाराष्ट्र व कर्नाटकातील मोठ्या भूभागावर आढळते. कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील भागाला ब्रिटिश कारनॅटिक असे म्हणत.[2]
कर्नाटक राज्याचा इतिहासाप्रमाणे मध्ययुगीन कर्नाटकात अनेक शक्तिशाली साम्राज्ये होऊन गेली. कर्नाटकाकडून शिल्पकला, संगीत, नृत्य, तत्त्वज्ञान, साहित्य यांची अनमोल परंपरा भारताला मिळाली आहे. स्वातंत्र्यानंतर साहित्य क्षेत्रात दिला जाणाऱ्या सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराचा मान सर्वाधिक वेळा कर्नाटकला मिळालेला आहे. कर्नाटकाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही भरीव प्रगती केलेली आहे. भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उच्च शिक्षणाचे खाजगीकरण करून भारताला सर्वाधिक पदवीधरांचा देश बनवण्यात कर्नाटकाने मोठी कामगिरी बजावलेली आहे. राज्याची राजधानी बंगळूर ही असून आज ती भारताची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील राजधानी समजली जाते.