पॅन अमेरिकन महामार्ग
From Wikipedia, the free encyclopedia
पॅन-अमेरिकन महामार्ग ( पोर्तुगीज: Rodovia/Autoestrada Pan-americana ; स्पॅनिश: Autopista/Carretera/Ruta Panamericana) हे उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत पसरलेले सुमारे ३०,००० किलोमीटर (१९,००० मैल) लांबीचे रस्त्यांचे जाळे आहे. [1] हा महामार्ग अमेरिका खंडांच्या उत्तर टोकाला दक्षिणेशी जोडतो. यात अंदाजे १०६ किमी (६६ मैल)चा खंड पडलेला आहे. वायव्य कोलंबिया आणि आग्नेय पनामा यांच्या मधील डेरिएन गॅप भागात अद्यापही रस्ता नाही. प्रचंड गर्द झाडी व वर्षभर होत असलेला तुफान पाउस यांमुळे हा भाग अजूनही अविकसित आहे. पॅन अमेरिकन महामार्ग अमेरिकेच्या पॅसिफिक किनाऱ्यावरील जवळजवळ सर्व देशांना जोडतो. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, पॅन-अमेरिकन महामार्ग हा "मोटारीने प्रवासकरण्याजोगा जगातील सर्वात लांब रस्ता" आहे.
पॅन-अमेरिकन महामार्ग अनेक प्रकारच्या हवामानआणि पर्यावरणीय प्रदेशांतून जातो — यात घनदाट जंगलांपासून ते रखरखीत वाळवंट आणि ओसाड टुंड्रापर्यंत सगळे प्रकार आहेत. या महामार्गाचा काही भाग केवळ कोरड्या हंगामात पार करता येतो आणि बऱ्याच प्रदेशांमध्ये वाहन चालवणे काही मोसमात धोकादायक असते. पॅन-अमेरिकन महामार्ग उत्तर अमेरिकेतील प्रुडहो बे, अलास्का पासून दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण टोकांजवळील चिलीमधील पोर्तो मॉन्ट आणि क्वेलोन आणि अर्जेंटिनामधील उशुआया शहरांना जोडतो.
डॅरिएन गॅपच्या पश्चिम आणि उत्तरेला, हा रस्ता मध्य अमेरिका आणि मेक्सिकोमधून आंतर-अमेरिकन महामार्ग म्हणूनही ओळखला जातो. तेथे हा महामार्ग मेक्सिको-युनायटेड स्टेट्स सीमेकडे जाणाऱ्या अनेक जोडरस्त्यांमध्ये विभाजित होतो.